रस्त्यांच्या कामाची माहिती द्या, अन्यथा आंदोलन करु : हिंदु जनसंघर्ष समितीचा इशारा

<p>रस्त्यांच्या कामाची माहिती द्या, अन्यथा आंदोलन करु : हिंदु जनसंघर्ष समितीचा इशारा</p>

कोल्हापूर - शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज हिंदु जनसंघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांची भेट घेतली. शहरात नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची माहिती द्यावी अन्यथा आंदोलन करु, असा इशारा यावेळी देण्यात आला.

कोल्हापूर शहरातील रस्त्यांची परिस्थिती सध्या भयावह झाली आहे. शहरातील प्रमुख आणि आंत ररस्त्यांवर पडलेले प्रचंड खड्डे, उखडलेलं डांबर, पावसाळ्यात साचलेलं पाणी आणि आता पावसाळ्यानंतर सर्वत्र उडणारी धूळ यामुळे नागरिकाचं जीवन धोक्यात आले आहे. खराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापती, कायमचं अपंगत्व आणि मृत्यू ओढवलेत. त्यामुळं आज हिंदु जनसंघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने मागील तीन वर्षात नव्यानं बनविण्यात आलेल्या डांबरीकरण रस्त्यांचे आणि दुरुस्ती केलेल्या सर्व रस्त्यांची यादी पालिकेच्या वेब साईटवर प्रसिद्ध करावी, प्रत्येक रस्त्याच्या कामासाठी जारी करण्यात आलेल्या वर्क ऑर्डरची प्रत उपलब्ध करून द्यावी, रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारांची संपूर्ण माहिती उपलब्ध करुन द्यावी, प्रत्येक रस्त्यासाठी मंजूर निधी आणि खर्च केलेला निधी याची माहिती द्यावी. प्रलंबित आणि मंजूर रस्ते कामांची अद्ययावत यादी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

 यावेळी अभिजीत पाटील, आनंदराव पवळ, सुनील सामंत, कविराज कबुरे, राजेंद्र तोरस्कर, संभाजी थोरवत, महेश पोवार, अजय सोनवणे, सुरेश जाधव, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.