बावडा लाईन बाजार परिसरात स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये तीव्र विरोध

कसबा बावडा - बावडा लाईन बाजार परिसरात स्मार्ट मीटरविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. कसबा बावड्यातील श्रीराम सोसायटीत झालेल्या बैठकीत महावितरणचे अधिकारी कासार व सूर्यवंशी यांच्यासोबत नागरिकांनी चर्चा केली. यावेळी नागरिकांनी नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिले दुप्पट प्रमाणात येत असल्याची तक्रार केली. दरम्यान, मुख्यमंत्री यांनी विधानसभेत “स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यात येणार नाही” असे स्पष्ट केले असताना, चुकीची माहिती देत जबरदस्तीने मीटर बदलले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप उलपे यांनी स्मार्ट मीटर बसविण्यास नागरिकांचा ठाम विरोध असल्याचे सांगितले. आधीपासूनच बसवलेले स्मार्ट मीटर काढून टाकून पुन्हा जुने मीटर बसवावे, अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी नागरिकांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी श्रीराम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, व्हाईस चेअरमन अनंत पाटील, संस्थेचे संचालक धनाजी गोडसे, श्रीराम सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.