सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी आयुक्त टाळाटाळ करत असल्याचा कृती समितीचा आरोप
...अन्यथा आयुक्तांवर फौजदारी तक्रार करु : कृती समितीचा इशारा

कोल्हापूर – शहरातील तावडे हॉटेल नजीक असणाऱ्या वीटभट्टी जवळच्या नाल्यातून उंचगाव, टेंबलाईवाडी, विक्रम नगर, मार्केट यार्ड परिसरातील सांडपाणी तसंच काही कारखान्यांचं रसायन मिश्रीत सांडपाणी थेट नदीत मिसळतं आहे. याच नाल्यात मटण, चिकन वेस्ट टाकण्यात येत असल्यानं स्थानिकांच्या आरोग्यासह जमीन नापीक होण्याची समस्या वाढलीय असा आरोप स्थानिकां मधून होतोय.
कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीने या समस्ये बाबत सातत्यानं आवाज उठवत अमृत १ या केंद्रशासनाच्या योजनेअंतर्गत दुधाळी झोनमधील ७४ कोटी निधीतील मलनिस्सारण योजनेतून या नाल्यातील सांडपाणी अडवून बापट कॅम्प फिल्टर हाऊसकडं वळवण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. चार वर्षांपूर्वी नोबेल कन्स्ट्रक्शन आणि सह्याद्री कन्स्ट्रक्शन या कंपन्यांना या कामासाठी वर्क ऑर्डर सुध्दा देण्यात आलीय. परंतु अद्याप काम सुरु झालेलं नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची वर्क ऑर्डर निघालीय, स्थानिकांनी प्रकल्पाला जमीन देण्याचं लेखी आश्वासन दिलंय. मग नेमकं घोडं अडलंय कुठं ? का टक्केवारी वाढवून मिळण्यासाठी हा प्रकल्प रेंगाळत ठेवलाय ? असा सवाल कोल्हापूर जिल्हा आणि शहर नागरी कृती समितीच्यावतीने करण्यात आलाय.
कृती समितीने महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी टाळाटाळ केली जातीय, असा आरोप केलाय. कृती समितीने आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना ई मेल पाठवत येत्या पंधरा दिवसांमध्ये या नाल्याचं काम सुरु करा, नाहीतर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करून अधिकारांचा गैरवापर केल्याबद्दल फौजदारी स्वरुपाची तक्रार दाखल करु, असा इशारा दिला आहे.