नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने गर्दी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

<p>नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने गर्दी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल</p>

कोल्हापूर - शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्रातून आणि परराज्यातून लाखो भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. अवजड, चार चाकी आणि दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीय. निर्माण चौकातल्या मोकळ्या मैदानावर ट्रक, ट्रॅव्हल्स, बस, मिनीबस या अवजड वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीय. कर्नाटक, कागलकडून शाहू टोल नाका मार्गे येणारी, तसेच राधानगरी आणि गारगोटीकडून येणाऱ्या अवजड वाहनांची निर्माण चौकातील रिकाम्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीय. गगनबावडा मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था पंचगंगा नदी घाटावरील पार्किंग तळावर करण्यात आलीय. रत्नागिरी मार्गावरून येणाऱ्या वाहनांची देखील पंचगंगा नदी घाटावरील वाहनतळावर पार्किंगची व्यवस्था केलीय.

पुणे, मुंबई, सातारा येथून येणाऱ्या सर्व प्रकारची अवजड वाहनांची खानविलकर पेट्रोल पंपा जवळच्या शंभर फुटी रोडवर पार्किंगची व्यवस्था केलीय तर तावडे हॉटेलकडून येणाऱ्या वाहनांची व्यवस्था शंभर फुटी रोडवर करण्यात आलीय. याशिवाय लहान चार चाकी आणि दुचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था बिंदू चौक, पेटाळा मैदान, गांधी मैदान, व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा या ठिकाणी करण्यात आलीय. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व वाहनतळावर लाईट, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आलीय.