कोल्हापुरातील बहुप्रतिक्षीत बहुमजली पार्किंग उद्यापासून सुरू...

<p>कोल्हापुरातील बहुप्रतिक्षीत बहुमजली पार्किंग उद्यापासून सुरू...</p>

कोल्हापूर -  नवरात्रोत्सवात अंबाबाई दर्शनासाठी दररोज लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात. त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी शहरात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने भाविकांना अडचणी येत होत्या. विविध ठिकाणी वाहने पार्किंग केली जात असल्याने शहरात वाहतूक कोंडी होत होती. शासनाने मंजूर केलेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील निधीतून सरस्वती टॉकीज जवळील बहुमजली पार्किंगची इमारत उभी केली जात होती. त्यासाठी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या काळात या बहुमजली पार्किंगसाठी निधी उपलब्ध झाला होता.

 त्यातून पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. बहुमजली पार्किंग आता सोमवारपासून सुरू होणार आहे. या पार्किंग इमारतीच्या बेसमेंटमध्ये २४० दुचाकी, तर तळमजला, पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर ७५ चारचाकींच्या पार्किंगची व्यवस्था होईल. त्यासाठी दहा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या पार्किंग इमारतीच्या ठिकाणची आज महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने यांच्यासह इस्टेट अधिकारी विलास साळोखे यांनी पाहणी केली. पहाटे सहा वाजल्यापासून पूर्ण क्षमतेने पार्किंग सुरू केले जाणार असल्याचे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने यांनी सांगितले.

या पार्किंगमध्ये चारचाकी वाहनाला तासाला ४० रुपयांची आकारणी असणार आहे. दुचाकीच्या पाार्किंगसाठी कोणतंही शुल्क आकारले जाणार नाही. तळमजल्यावर १५ चारचाकींची व्यवस्था तर पहिला आणि दुसऱ्या मजल्यावर ६० चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आलीय, अशा एकूण ७५ चारचाकी पार्किंगमध्ये असणार आहेत.

मोठ्या शहरात पार्किंगसाठी राबवण्यात येत असलेली फास्टटंगची यंत्रणा उभी करणं सर्वात जास्त सोयीचे आणि सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे वेळेनुसार शुल्काची अचूक आकारणी  होवून महापालिकेला त्यातुन अपेक्षित उत्पन्न मिळू शकेल. याबाबतही महानगरपालिकेने निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.