समाजमाध्यमांवर जातीय भावना भडकवणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करा : बावडा वासीयांची मागणी
दि कसबा बावडा फाईल्स विरोधात बावडा वासियांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभुमी असलेल्या कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्व धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने राहत आहेत. मात्र सध्या काही समाजमाध्यमांवरून आक्षेपार्ह माहिती पसरवत समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
"दि कसबा बावडा फाईल्स" या नावानं काही घटनांचा एकत्रित उल्लेख करून विशिष्ट समाजाविरोधात वातावरण दूषित केले जात असल्याचा आरोप कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील नागरिकांकडून करण्यात आलाय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक शांतता बिघडू नये, यासाठी पोलिसांनी तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणार निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना सादर करण्यात आले आहे.
येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या परिसरातील नागरिक अशा कारवायांना थारा देणार नाहीत, असे सामाजिक कार्यकर्ते मानसिंग जाधव यांनी सांगितले आहे.
दसरा आणि दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी श्रीराम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, व्हाईस चेअरमन अनंत पाटील, युवराज उलपे, सागर यवलुजे, विनायक खामकर, गणेश जाधव, राहुल आळवेकर, तानाजी बिरंजे यांच्यासह कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील नागरिक उपस्थित होते.