महानगरपालिका व ‘महाप्रीत’ यांच्यात सामंजस्य करार

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिका आणि राज्य शासनाची शासकीय संस्था महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (MAHAPREIT) यांच्यात आज सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराअंतर्गत ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे, महापालिकेच्या इमारतींवर सौर रूफटॉप प्रकल्प, पाणी शुद्धीकरण प्रकल्प व STP वरील सौर प्रणाली, ई-चार्जिंग स्टेशन, मालमत्ता कर मूल्यांकन, वाहतूक व्यवस्थापन, डिजिटल जाहिरात उपक्रम, घनकचरा व्यवस्थापन, शून्य कार्बन उपक्रम, पर्यावरण संरक्षण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा विकास अशा क्षेत्रांमध्ये संयुक्तरीत्या प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
➡️ G2G भागीदारीतून शाश्वत विकासाच्या दिशेने पाऊल -
हा करार राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर, नगरविकास राज्यमंत्री व सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महानगरपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या पुढाकाराने शाहूजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे करण्यात आला. या सामंजस्य करारावर महानगरपालिकेच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे, तर महाप्रीत वतीने मुख्य व्यवस्थापक संतोष वाहणे आणि महाव्यवस्थापक उमाकांत पांडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. ही G2G (Government-to-Government) भागीदारी कोल्हापूर शहराच्या शाश्वत, स्मार्ट आणि पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयेन एस, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.