‘यामुळे’ राधानगरी अभयारण्यातील वन्यजीव संकटात...
कोल्हापूर - मांजर खिंड ते दाजीपूर आणि मांजर खिंड ते काळम्मावाडी या प्रमुख पर्यटन मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या वृक्षांना रिप्लेकटर, विविध व्यावसायिक जाहिरातींचे फलक लावण्यासाठी अक्षरशः खिळे ठोकून लावण्यात आले आहेत. यामुळे वृक्षांचे नैसर्गिक आरोग्य धोक्यात आले आहे. पर्यावरणप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याच मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला चिकन वेस्ट, हॉटेलमधील अन्नकचरा आणि प्लास्टिकचा कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून याचा पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या अस्वच्छतेचा थेट परिणाम अभयारण्यातील वानरांसह, भेकर, रानडुक्कर यासारख्या वन्यप्राण्यांवर होत आहे. प्लास्टिक आणि अन्नकचऱ्यामुळे त्यांचे आरोग्य आणि नैसर्गिक जीवन धोक्यात आले आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या असलेल्या या भागात होत असलेला पर्यावरणीय ऱ्हास तात्काळ थांबवावा, वृक्षांना खिळे ठोकणाऱ्यांवर, कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वृक्ष आणि वनप्रेमी नागरिकांकडून होत आहे. पर्यटनाच्या विकासातूनच राधानगरी तालुक्याचा विकास शक्य आहे. तालुक्यामध्ये पर्यटन वाढ होण्यासाठी स्वच्छता, शिस्त जपणे गरजेचे आहे. त्यासाठी वनविभाग, व्यवसायिक, पर्यटक आणि स्थानिकांमधून सामुदायिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. राधानगरीचा निसर्ग अनुभवण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. त्यामुळे हा निसर्ग चांगला राखणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे.