देशसेवेची परंपरा असलेल्या नावली गावात माजी सैनिक असोसिएशनची स्थापना

<p>देशसेवेची परंपरा असलेल्या नावली गावात माजी सैनिक असोसिएशनची स्थापना</p>

कोल्हापूर - पन्हाळा गडाच्या पायथ्याला असलेले नावली हे गाव छोटसे असले तरी या गावाला देशसेवेची मोठी परंपरा आहे. येथे आजी, माजी सैनिकांची संख्या मोठी आहे. गावात घरोघरी आजी किंवा माजी सैनिक आढळून येतात. या सर्व आजी - माजी सैनिकांनी एकत्र येऊन माजी सैनिक असोसिएशनची स्थापना केली आहे. आजी - माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाच्या समस्या दूर करणे, तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी भरतीपूर्व शिक्षण देण्याची व्यवस्था करणे, याचबरोबर रोजगार, व्यवसाय, नोकरी या करिता मार्गदर्शन करणे हा असोसिएशन स्थापन करण्यामागचा उद्देश असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष हरी पाटील यांनी सांगितले.

सुरवातीला पारंपरिक लेझीम पथकाद्वारे गावातून भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर सैनिक फेडरेशनचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभेदार विजय पाटील, सुभेदार मेजर बाबुराव नरके यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी ९३ वर्षीय ज्येष्ठ माजी सैनिक बाबुराव पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना सुभेदार विजय पाटील यांनी नावली गावातील माजी सैनिकांची संघटना एक दिलाने आणि एक मताने काम करेल, असा विश्वास व्यक्त करत या संघटनेला आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

या कार्यक्रमाला सुभेदार मेजर बाबुराव नरके, संघटनेचे उपाध्यक्ष सुभेदार मेजर बाळासाहेब पाटील, सुभेदार मेजर गणपती घोलप, कॅप्टन मिलिंद पाटील, सुभेदार मेजर संभाजी कराळे, सुभेदार मेजर धनाजी मोहिते, सुभेदार मेजर मोहन पाटील, सुभेदार विष्णू बर्गे यांच्यासह संघटनेचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.