जनस्वास्थ दक्षता समितीच्यावतीने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जनस्वास्थ अभियान

<p>जनस्वास्थ दक्षता समितीच्यावतीने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जनस्वास्थ अभियान</p>

कोल्हापूर - जागतिक तापमान वाढ, वाढती व्यसनाधीनता, किशोरवयीन मुलांच्या समस्या या प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आठशे माध्यमिक शाळांमध्ये एक ते सात जानेवारी या कालावधीत जनस्वास्थ अभियान राबवण्यात येणार, असल्याची माहिती जनस्वास्थ दक्षता समितीच्यावतीने देण्यात आली.

जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने हे अभियान राबवण्यात येणार आहे. एक जानेवारीला जनस्वास्थ प्रतिज्ञा घेतली जाईल. दोन जानेवारीला आरोग्य आणि पर्यावरण या विषयांवर पोस्टर्स स्पर्धा तर तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त किशोरवयीन लैंगिक समस्या आणि त्याबाबत घ्यावयाची दक्षता याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. पाच जानेवारी रोजी कुष्ठरोग, क्षयरोग, एड्स, कीटकजन्य आजार आदींविषयी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सहा जानेवारीला शाळांच्या परिसरात स्वच्छता राबवण्याबरोबरच विद्यार्थ्यांना घरातील कचऱ्यापासून खत निर्मिती, फळझाडे लागवड, टेरेसवरील भाजीपाला लागवड, सांडपाणी पुनर्वापर, सौर ऊर्जेचा वापर, टाकाऊ अन्न पदार्थापासून बायोगॅस निर्मिती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ध्वनी हवा जल प्रदूषण, वाहतुकीचे नियम याबद्दल प्रबोधन केले जाणार आहे. सात जानेवारी रोजी व्यसनांबाबत जनजागृती करण्यासाठी शाळेजवळील प्रमुख रस्त्यावर चार ते पाच या वेळेत मानवी साखळीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अभियान काळात सायकल फेरी, पथनाट्य आदी उपक्रम आयोजित केले जाणार आहे. या अभियानातील आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, कार्यकर्ते आणि पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे.

या पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर, सुधीर हंजे, अजय अकोळकर, लतीफ शेख आदी उपस्थित होते.