बांगलादेशाच्या ‘या’ पहिल्या महिला पंतप्रधानांचं निधन...
८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली – बांगलादेशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे आज पहाटे निधन झाले आहे. यावेळी त्यांचे वय ८० वर्ष होतं. त्या शेख हसीना यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी होत्या. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या त्या अध्यक्षा होत्या.
खालिदा झिया गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. ढाका येथील एव्हरकेअर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या गेल्या अनेक वर्षांपासून हृदयविकार, यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्या, मधुमेह, फुफ्फुसाचे आजार, संधिवात आणि डोळ्यांशी संबंधित गंभीर आजारांशी झुंज देत होत्या.
१९८१ मध्ये लष्करी उठावात पतीची हत्या झाल्यानंतर खालिदा झिया यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८४ मध्ये त्यांनी 'बीएनपी'ची धुरा आपल्या हाती घेतली. १९९१ मध्ये त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवत बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवला. त्यांनी १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००६ अशा दोन वेळा पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले होते.