सह्याद्री वक्तृत्व स्पर्धेत मुंबईची गायत्री देसले प्रथम

<p>सह्याद्री वक्तृत्व स्पर्धेत मुंबईची गायत्री देसले प्रथम</p>

कोल्हापूर - राष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त न्यू कॉलेज मराठी विभाग कोल्हापूर, शाश्वत फाउंडेशन आणि भाषा विकास संशोधन संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'सह्याद्री राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा २०२५' मध्ये मुंबईच्या गायत्री देसले हिने प्रथम क्रमांक पटकावून गौरव प्राप्त केला. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच कोल्हापुरातील न्यू कॉलेज ऑडिटोरियम हॉल, शिवाजी पेठ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये संकेत कृष्णा पाटील याने दुसरा तर केदार पाटील याने तिसरा क्रमांक पटकावला. “अभिजात मराठी भाषा वास्तव आणि वर्तमान, महाराष्ट्र : कालचा, आजचा आणि उद्याचा, लोकशाही आणि निवडणुका, भारत महासत्ता झाला का?, महाराष्ट्राने देशाला काय दिले?, नवशैक्षणिक धोरण तारक की मारक” असे स्पर्धेतील विषय होते. राज्यभरातून आलेल्या उत्साही तरुण वक्त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून प्रेक्षकांची मने जिंकली. वक्तृत्वकलेचा उच्चांक गाठणाऱ्या या स्पर्धेने पुन्हा एकदा मराठी भाषा, विचार आणि लोकशाही मूल्यांमध्ये युवकांचा खंबीर सहभाग असल्याचं दाखवून दिलं. विजेत्यांना ज्येष्ठ विचारवंत शरद आजगेकर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी, “मत मांडताना केवळ माहिती नव्हे, तर चिंतन आणि विचारांची खोली असणं अत्यंत गरजेचं आहे.” असं आजगेकर यांनी सांगितलं.

यावेळी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक प्रा. विनय पाटील, न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही. एम. पाटील, प्रा.जी. आर. पाटील, शाश्वत फौंडेशनचे सुभाष पाटील, डॉ. मनीषा नायकवडी उपस्थित होते.