शिल्पकार विशाल शिंदेंच्या शिल्प कलेतून अवतरला कलेचा स्वर्ग...
कोल्हापूर - शहरातील संत गोरोबा कुंभार सांस्कृतिक सभागृहात दि. व्ही. फाउंडेशनच्यावतीने आज कला, संवाद आणि जिवंत शिल्पकलेच्या कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुंबईतील त्रिमूर्ती आर्ट्सचे प्रख्यात शिल्पकार विशाल शिंदे यांनी शिल्पकलेची प्रात्यक्षिके सादर केली. शिल्पकार शिंदे यांच्या जादूई हातांतून साकारणारी शिल्पकला प्रत्यक्ष पाहताना उपस्थित रसिकांनी कलेचा स्वर्गच अवतरल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी शिंदे यांनी, चिखलाच्या गोळ्यातून अत्यंत जिवंत वाटणारी शिल्पं साकारण्याची प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्या हातातील सफाई आणि अचूक बारकावे पाहून उपस्थित कला रसिक भारावून गेले होते. प्रात्यक्षिकांबरोबर यावेळी झालेल्या कला संवादाने कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. विशाल शिंदे यांनी अत्यंत मोजक्या आणि गोड शब्दांत शिल्प कलेतील तांत्रिक बारकावे, छटा आणि कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित कलाकारांशी संवाद साधताना कलेप्रती असलेली निष्ठा आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. दि. वी. फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे कोल्हापुरातील नवोदित कलाकारांना एका जागतिक दर्जाच्या शिल्पकाराकडून शिल्पकला शिकण्याची संधी मिळाली. या कार्यशाळेमध्ये कलामंदिर महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच कोल्हापूर शहराबरोबर चंदगड, आजरा, गारगोटी, इचलकरंजी, सांगली परिसरातील कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महादेव वडणगेकर, सतिश वडणगेकर, उमेश कुंभार, दिनकर कुंभार, सचिन पुरेकर, अभिजीत सूर्यवंशी आदींनी या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.