रत्नागिरीत फलटण डॉक्टरसारखी पुनरावृत्ती होता होता टळली...

<p>रत्नागिरीत फलटण डॉक्टरसारखी पुनरावृत्ती होता होता टळली...</p>

रत्नागिरी – फलटणमध्ये महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येमुळे राज्याची आरोग्य यंत्रणा हादरली आहे. महिलांवर होत असलेल्या  छळाबाबत चिंता व्यक्त होत असताना फलटणसारखीच पुनरावृत्ती  रत्नागिरी जिल्ह्यात होता होता टळली आहे. 
 
रत्नागिरी जिल्ह्यातील एका आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजकीय पुढाऱ्याच्या त्रासाला कंटाळून थेट राजीनामा दिल्याची घटना घडली होती. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे देवरुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने अचानकपणे राजीनामा दिला. या महिला अधिकाऱ्याची आरोग्य सेवा उत्तम होती. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने परिसरातील ग्रामस्थांना धक्का बसला आणि परिसरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली. अखेर, ग्रामस्थांनी एक विशेष सभा बोलावून या महिला डॉक्टरला राजीनाम्यामागचे नेमके कारण विचारले.
यावेळी महिला डॉक्टरने धक्कादायक कारण सांगितले. एका स्थानिक राजकीय पुढाऱ्याकडून त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. हा प्रकार ऐकूण उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणातील राजकीय पुढारी हा नेहमीच 'चमकेगिरी' करणारा आणि प्रत्येक कार्यक्रमात पुढे असणारा होता. विशेष म्हणजे, या आरोग्य केंद्राशी त्याचा प्रत्यक्ष संबंध नसतानाही तो हस्तक्षेप करत होता. ग्रामस्थांनी त्वरीत त्या राजकीय पुढाऱ्याला बैठकीला बोलावले. बैठकीत त्याने आपली चूक मान्य केली आणि महिला डॉक्टरची माफीही मागितली. यामुळे महिला डॉक्टरने आपला राजीनामा मागे घेतला.