फुफ्फुसा वरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी; अपघातग्रस्त रुग्णाला सीपीआरमध्ये पुनर्जन्म

सीपीआरमध्ये करण्यात आली भारतातली' 'ही" पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया

<p>फुफ्फुसा वरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी; अपघातग्रस्त रुग्णाला सीपीआरमध्ये पुनर्जन्म</p>

कोल्हापूर - ३१ डिसेंबर २०२५ ला सोहम मालवे यांना अत्यंत चिंताजनक अवस्थेत सीपीआर रुग्णालयातील हृदयशस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांच्या उजव्या फुफुसाची श्वासनलिका पूर्णपणे तुटली होती. त्यामुळं त्यांना श्वास घेणं शक्य होत नव्हतं खाजगी रुग्णालयात यावर तात्पुरते उपचार करून त्यांना पुणे किंवा मुंबईला जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. यातील सर्वात महत्वाची अडचण म्हणजे श्वासनलिकाच तुटल्यानं रुग्णाला व्हेंटिलेटरवर घेणं अथवा भूल देणं शक्य नव्हतं पण भूल दिल्याशिवाय कुठलीही शस्त्रक्रिया करणं शक्य नसल्यानं आणि रुग्णाचं ऑक्सिजनचं प्रमाण तीस टक्के असल्यानं वेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं.

त्यामुळं हृदयशस्त्रक्रिया विशारद डॉ. किशोर देवरे यांनी शस्त्रक्रियेसाठी लंग मशीनचा वापर केला. रुग्णाला जागं असतानाच विशिष्ट तंत्रज्ञान वापरून हार्ट लंग मशीनवर घेण्यात आलं.. त्यानंतर रुग्णाची छाती उघडून तुटलेली श्वासनलिका आणि आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तुटलेली श्वासनलिका विशिष्ट प्रकारचे धागे वापरून शिवण्यात आली. त्यानंतर रुग्णाला व्हेंटिलेटरवर घेणं शक्य झालं. मग हार्ट लंग मशीनवरून रुग्णाला काढण्यात आलं. दोन दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर रुग्ण स्वतः श्वास घेऊ लागला. साधारण १५ दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आलं. अशाप्रकारची भारतातली ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचा दावा अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे यांनी केलाय.

या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ भूषण मिरजे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. तर डॉ माजिद मुल्ला, डॉ हेमलता देसाई, डॉ संदीप मोहिते, डॉ पल्लवी पवार, दीपाली जाधव यांचं या शस्त्रक्रियेसाठी सहकार्य लाभलं.