जिल्ह्यातील खात्यांमध्ये तब्बल १३६ कोटी रुपये पडून ...दीर्घकाळ निष्क्रिय खात्यांवरील रक्कम परत मिळविण्यासाठी सुवर्णसंधी : जिल्हाधिकारी

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ४ लाख ७३ हजार २७० खात्यांमध्ये तब्बल १३६ कोटी रुपये निष्क्रिय स्वरूपात पडून आहेत. ही खाती मागील १० वर्षांपासून व्यवहारविरहित असल्याने संबंधित रक्कम डीईए फंडात हस्तांतरित करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या (MoF), वित्तीय सेवा विभागाच्या (DFS) निर्देशानुसार, राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC) व सर्व बँकांच्या सहकार्याने १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हाभरात विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
त्यानुसार १५ व १६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहून अशा निष्क्रिय खात्यांची कागदपत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे ज्यांची खाती दीर्घकाळापासून निष्क्रिय आहेत त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व आपली रक्कम परत मिळवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
तसेच खातेदाराचा मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीने संबंधित शाखेशी संपर्क साधून आधार कार्ड,पॅन कार्ड, अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो असे आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
रिझर्व्ह बँकेने (RBI) नागरिकांसाठी “Udgam” ही ऑनलाईन पोर्टल सुरू केली आहे, ज्या ठिकाणी आपण आपल्या न वापरलेल्या खात्यांवरील रकमेची माहिती पाहू शकता: https://udgam.rbi.org.in/unclaimed-deposits/#/login “आपले पैसे सुरक्षित आहेत, घाबरू नका,” असा संदेश कोल्हापूरच्या लीड बँक व्यवस्थापकांनी दिला आहे.