शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावला कृषी विभाग...
पूरबाधित शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी एकदिवसाचा पगार देणार...

मुंबई - सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा विदर्भ आणि मराठवाड्याला मोठा फटका बसला. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली. अनेकांचे संसार पुराच्या पाण्यातून वाहून गेले. राज्यात सुमारे ६० लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे या पावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सरकारसह विविध पक्ष, संघटनांच्या माध्यमातून पूरबाधित भागातील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातोय. यामध्ये आता राज्याच्या कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी सुध्दा योगदान देण्यासाठी पुढं आले आहेत. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या एक दिवसाच्या पगाराची सहा कोटी पंधरा लाख रूपये इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे.