'मी कुमार' नाटकातून नाते संबंधां मधील ताण तणावावर प्रकाश
राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत शुक्रवारी इचलकरंजीतील निष्पाप कलानिकेतन संस्थेने विजय तेंडुलकर लिखित "मी कुमार" हे नाटक सादर केलं . दिग्दर्शक अभिजीत पाठक यांनी या नाटकातून नातेसंबंधातील गुंतागुंत, सामाजिक बांधिलकी आणि माणसाच्या मनातील गोंधळलेले द्वंद्व रंगमंचावर प्रभावीपणे मांडले.
मूळ गुजरातीमधील मधु राय यांच्या "कुमारणी आगाशी" या नाटकाचे मराठी रूपांतर विजय तेंडुलकर यांनी 1968 साली "मी कुमार" या नावाने केले. पन्नास वर्षांपूर्वी लिहिलं असलं तरी नातेसंबंध, सामाजिक जबाबदारी आणि मानवी मूल्यांवरील प्रश्न आजही तितकेच लागू पडतात, हे या प्रयोगातून दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिग्दर्शक पाठक यांनी सांगितले.
पाठक यांच्या मते, उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांतील नातेसंबंधातील ताण-तणाव हे अनेकदा उलगडत नाहीत. प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक स्वतंत्र जग असते आणि त्यातून उद्भवणाऱ्या नैतिक अनैतिक द्वंद्वांमुळे अनेक घटना ‘रहस्य’ बनून राहतात. “प्रत्येकाच्या मनात एक कुमार दडलेला असतो; त्याला काय वाटतं हे या नाटकातून सांगायचा प्रयत्न केला आहे,” असे ते म्हणाले.
नाटकात अमर व्यास या श्रीमंत गृहस्थाची भूमिका विजयानंद लंबे यांनी निभावली असून, मेजवानीनंतर उलगडणाऱ्या चर्चेतून नातेसंबंध आणि सामाजिक बंधनांचे कालातीत स्वरूप रंगवले जाते.
अनुजा कुलकर्णी यांच्या साजेशा संगीतासह वैष्णवी हळदी, अनिरुद्ध भागवत, स्नेहल बंडगर, हितेश दायमा, आसावरी निर्मिती आणि हर्षवर्धन कारंडे यांनी भूमिका साकारल्या.
गेल्या ५० वर्षांत नातेसंबंध आणि सामाजिक बांधिलकीच्या प्रश्नांमध्ये फारसा बदल झालेला नाही, हे वास्तव “मी कुमार” च्या प्रयोगातून प्रभावीपणे मांडण्यात आले.