केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रखडलेल्या कामाकडे रंगकर्मीनी वेधले लक्ष
कोल्हापूर - संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रखडलेल्या कामाबाबत मागील पाच - सहा महिन्यापासून रंगकर्मीच्यावतीने सात्यत्याने पाठपुरावा केला जातोय. काम पूर्ण होऊन रंगकर्मी दिनादिवशी नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिले होते. मात्र याची पूर्तता न झाल्याने आज रंगकर्मीनी नाराजी व्यक्त करत केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जळालेल्या मंचावर आपली कला सादर केली. त्यानंतर अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
लावणी कलाकारांनी ज्या मातीतून लावणी उदयास आली त्याच कोल्हापूर नगरीत लावणीला थिएटर मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. ही कला जगावी आणि जोपासावी वाटत असेल तर थिएटर द्या, असे आवाहन कलाकारांनी केले. दरम्यान महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी येत्या पंचवीस नोव्हेंबर पर्यंत केशवराव भोसले नाट्यगृहाची रखडलेली सर्व कामी पूर्ण केली जातील आणि पंचवीस मार्च अखेर संपूर्ण काम पूर्ण होईल असे आश्वासन दिलंय. या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा कलाकारांच्या वतीने अभिनेते आनंद काळे यांनी दिलाय.
दरम्यान उद्या महापालिकेमध्ये रंगकर्मी आणि महापालिका प्रशासन यांच्यात संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत सध्याच्या कामाबाबत सूचना करण्यात येणार असल्याचे काळे यांनी सांगितले. यावेळी किरणसिंह चव्हाण, प्रसाद जमदग्नी, सुनील घोरपडे, सुनील माने, रोहन घोरपडे, मनपा उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वाड्रे यांच्यासह कलाकार, प्रेक्षक उपस्थित होते.