श्रेयस तळपदे घेऊन येतोय “मर्दिनी” – एका स्त्रीशक्तीच्या गौरवाची कहाणी

<p>श्रेयस तळपदे घेऊन येतोय “मर्दिनी” – एका स्त्रीशक्तीच्या गौरवाची कहाणी</p>

कोल्हापूर – मराठी चित्रपटसृष्टीतील बहुआयामी अभिनेता आणि निर्माता श्रेयस तळपदे आता आणखी एका वेगळ्या विषयावरील चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात करत आहे. ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. च्या बॅनरखाली साकारला जाणारा “मर्दिनी” हा चित्रपट केवळ एक मनोरंजनात्मक कलाकृती नसून, प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेल्या शक्ती, सहनशीलता आणि धैर्याचा जयघोष करणारा एक सशक्त संदेश घेऊन येतो आहे.

 

"असू देत लाख महिषासुर... पुरे आहे फक्त एक 'मर्दिनी'" या ओळींमधूनच चित्रपटाची मध्यवर्ती भावना अधोरेखित होते – अन्यायाविरुद्ध उठणारा स्त्रीचा निर्धार. समाजातील अंधार, अत्याचार आणि अन्याय यांचा सामना करत एक सामान्य स्त्री कशी "मर्दिनी" बनते, ही या चित्रपटाची कहाणी आहे. या चित्रपटाद्वारे अजय मयेकर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. एक नव्या दृष्टिकोनातून साकारलेली ही कथा प्रेक्षकांसाठी एक अनुभव ठरणार आहे.

 

चित्रपटाच्या कलाकारांची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी, या निर्मिती संस्थेने पूर्वी सई ताम्हणकर, तृप्ती डिंमरी, अनिता दाते यांसारख्या कलावंतांना संधी देत त्यांचा सशक्त वापर केला आहे. त्यामुळे ‘मर्दिनी’मध्येही दर्जेदार अभिनय पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाची नांदी झाली असून, २०२६ साली ‘मर्दिनी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

निर्माता श्रेयस तळपदे यांनी , “प्रेक्षकांना वेगळं आणि अर्थपूर्ण देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. 'मर्दिनी' ही केवळ एक कथा नाही, ती स्त्रीशक्तीचा एक सन्मान आहे. या चित्रपटात प्रत्येक स्त्रीच्या अंतर्गत शक्तीला, तिच्या संघर्षाला आणि तिच्या जिद्दीला आपण सलाम करणार आहोत.” असे सांगितले.

 

“मर्दिनी” हा चित्रपट केवळ पाहण्याची गोष्ट नाही, तर अनुभवण्याची आणि आत्मपरीक्षण करायला लावणारी कहाणी ठरणार आहे. समाजातील प्रत्येक स्त्री ही "मर्दिनी" आहे – ही जाणीव अधिक प्रखरतेने मांडणारा हा चित्रपट आपल्याला निश्चितच विचार करायला भाग पाडेल. प्रेक्षकांनी उत्सुकतेने वाट पाहावी असा हा सिनेमा, तुमच्यासमोर लवकरच मोठ्या पडद्यावर येत आहे.