केशवराव भोसले नाट्यगृहाचे रखडलेले नूतनीकरण हे कोल्हापूरकरांसाठी लाजिरवाणे..! : बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती

<p>केशवराव भोसले नाट्यगृहाचे रखडलेले नूतनीकरण हे कोल्हापूरकरांसाठी लाजिरवाणे..! : बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती</p>

कोल्हापूर – केशवराव भोसले नाट्यगृहाचे रखडलेले नूतनीकरण हे कोल्हापूरकरांसाठी लाजिरवाणे आहे. ठेकेदारांनी शब्द दिल्याप्रमाणे नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले नाही तर या गलथान आणि संथ काराभारा संदर्भात निष्क्रिय प्रशासनाला  आणि बेजबाबदार ठेकेदाराला बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती जनआंदोलन उभे करून कोल्हापुरी दणका देईल असा इशारा बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे संस्थापक किसनराव कल्याणकर आणि अध्यक्ष रामेश्वर पतकी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
कृती समितीने पत्रात म्हटले आहे कि, कोल्हापूरचे वैभव असणारे केशवराव भोसले नाट्यगृह ८ ऑगस्ट २०२४ रोजी आगीच्या भक्षस्थानी पडले. यानंतर कोल्हापुरातील आमदार,खासदार ,मंत्री महोदय या सर्वांनी भरीव मदत करून केशवराव भोसले नाट्यगृह एक वर्षात पुन्हा दिमाखाने उभे राहील असे अभिवचन कोल्हापूरकरांना दिले होते. परंतु सध्या निधी उपलब्ध झाला असूनही केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण मात्र कासव गतीने चालू आहे.. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामात कोणतीही सुधारणा दिसत नसून याबाबत सातत्याने रंगकर्मी आणि नाट्यगृहाचे काम करणारे ठेकेदार यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडत आहे. 
बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीनेही वेळोवेळी या कामाची पाहणी करून जाहीर पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु अजूनही केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम हे दर्जेदार झालेले दिसत नाही.. एक वर्ष होऊन गेले तरी कामामध्ये म्हणावी तशी प्रगती दिसत नाही.. 
पाऊस आहे.. साहित्य उपलब्ध झाले नाही..असली फालतू कारणे देऊन ठेकेदार आपली अकार्यक्षमता लपवत आहे असा स्पष्ट आरोप  बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष रामेश्वर पतकी  आणि संस्थापक किसनराव कल्याणकर यांनी केला आहे.
कोल्हापुरातील रंगकर्मी आणि सुजाण नागरिकांनी यासंदर्भात केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची सातत्याने माहिती घेऊन कोल्हापूरकरांची अस्मिता असणाऱ्या नाट्यगृहाचे काम दर्जेदार व्हावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.. यासाठी सर्वच रंगकर्मींनी आणि सुजाण नागरिकांनी सध्या पुढाकार घ्यावा, अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर पश्चातापाखेरीज हाती काही येणार नाही असे कोल्हापुरातील रखडलेल्या आणि अर्धवट प्रकल्पांवरून दिसून येते, असे बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने पत्रकात नमूद केले आहे.
या पत्रकावर सतीश पोवार, मुसाभाई शेख, पद्माकर कापसे, राजेश पार्टे, महेश साळोखे, दीपक म्हेतर,सुनील हंकारे, अनिल कोळेकर यांच्यासह  अन्याय निवारण कृती समितीच्या अनेक सदस्यांच्या सह्या आहेत.