कोल्हापुरातील बालनाट्य चळवळीला अधिक वेग येणे आवश्यक : अविनाश देशमुख

<p>कोल्हापुरातील बालनाट्य चळवळीला अधिक वेग येणे आवश्यक : अविनाश देशमुख</p>

कोल्हापूर – कोल्हापुरातील बालनाट्य चळवळीला अधिक वेग येणे आवश्यक असून पुणे-मुंबईसारख्या शहरांप्रमाणे येथेही मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवले गेले पाहिजेत. यासाठी रंगकर्मींनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अविनाश देशमुख यांनी केले.
२२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन  ज्येष्ठ रंगकर्मी संजय तोडकर, अविनाश देशमुख, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्याध्यक्ष व नाट्यवितरक आनंद कुलकर्णी, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बालरंगभूमीसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी संजय तोडकर व अविनाश देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शैक्षणिक व सांस्कृतिक योगदानाबद्दल एम.एल.जी. हायस्कूलच्या शिक्षिका विशाखा जितकर यांचा सन्मान ज्येष्ठ बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध संघांनी आपली बालनाट्ये सादर केली. यामध्ये पेठ वडगाव येथील आदर्श गुरुकुल विद्यालयाचे ‘बालपण हरवले रे देवा’, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे ‘झेप’, कमशिप्र मंडळाच्या आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ यांचे ‘मनातल्या भुतांची ऐशीतैशी’, कुडाळ हायस्कूलचे ‘बीज अंकुरले’, बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांचे ‘उंदीर मामाची जादुई दुनिया’ तसेच बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ यांचे ‘पक्ष्यांचे कवी संमेलन’ या नाटकांचा समावेश होता.
ही स्पर्धा शनिवारपर्यंत सुरू राहणार असून कोल्हापूर आणि  कोकण विभागातील विविध संघ आपली बालनाट्ये सादर करणार आहेत. यावेळी परीक्षक गिरीश भुतकर, हनुमान सुरवसे आणि वैदेही चवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.