इचलकरंजी महापालिकेची आरक्षण सोडत पुन्हा
तांत्रिक चुका उघड झाल्याने महिला व मागास प्रवर्ग महिलांसाठी नव्याने प्रक्रिया
इचलकरंजी – इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत सोमवारी पुन्हा एकदा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात ही प्रक्रिया होणार असून तीन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या सोडतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षणात तांत्रिक चूक झाल्याचे निवडणूक विभागाच्या तपासणीत आढळले आहे. त्यामुळे केवळ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या वर्गांसाठी नव्याने आरक्षण निर्धारण करण्यात येणार असल्याचे आदेश निवडणूक विभागाकडून महापालिकेला देण्यात आले आहेत.
महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. ही सोडत महापालिकेकडून मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली. त्यावेळी आरक्षण यादीची तपासणी करताना संबंधित तांत्रिक त्रुटी निदर्शनास आली. त्यामुळे आयोगाने सुधारित सोडत काढण्याचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर सोमवारी नव्याने होणाऱ्या सोडतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले असून चांगलीच खळबळ उडाली आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार विविध पक्षांनी रणनीती आखण्यासह संभाव्य उमेदवारांनी तयारी सुरू केली होती. मात्र, आरक्षणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाल्याने राजकीय गणिते पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे आहेत.
सुधारित आरक्षणावरील हरकती व सूचना १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान स्वीकारण्यात येणार असून अंतिम आरक्षण यादी त्यानंतर निश्चित होणार आहे. नव्या सोडतीनंतर प्रभाग रचना आणि निवडणूक तयारीचा पुढील प्रवास कसा असेल याबाबत सर्वच राजकीय पक्षांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.