स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृतीयपथांना प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

<p>स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृतीयपथांना प्रतिनिधीत्व देण्याची मागणी</p>

कोल्हापूर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज तृतीयपंथीयांच्या मैत्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी तृतीयपंथी समाजातील घटकांना प्राधान्याने उमेदवारी द्यावी. तृतीयपंथीयांमध्ये जनतेशी जोडून राहण्याची आणि त्यांच्या प्रश्नांवर उपाय शोधण्याची खरी राजकीय क्षमता आहे याचा राजकीय पक्षांनी विचार करावा. सन १९६५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील देवदासी तृतीयपंथी समाजातील बाळू चौगुले यांनी निवडणूक लढवली होती त्यानंतर तब्बल तीन दशकांत तृतीयपंथीयांना कुठंही संधी मिळाली नसल्याचे मैत्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

 कोल्हापूर जिल्हाला शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी नेहमीच दुर्लक्षित आणि वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृतीयपंथीय समाजातील उमेदवारांना संधी द्यावी, अन्यथा तृतीयपंथीय समाजाच्या वतीने कोल्हापुरातील महापालिका निवडणुका स्वबळावर लढू, असा इशारा संघटनेच्या सेक्रेटरी शिवानी गजबर यांनी दिला आहे.

पत्रकार बैठकीला अध्यक्षा मयुरी आळवेकर, अमृत आळवेकर, सुहासिनी आळवेकर, अंकिता आळवेकर उपस्थित होत्या.