भाजप चेटकीणीसारखे माणसे गिळण्याचे काम करतंय : हर्षवर्धन सपकाळ
सत्तेचा मुकुट नव्हे तर, जनतेचे प्रेम महत्त्वाचे : आ. सतेज पाटील
कोल्हापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रावणापेक्षा अधिक अहंकारी असून त्यांच्या वाणीतून आणि विचारातून त्यांचा अहंकारीपणा दिसून येतोय, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. भाजप चेटकीणीसारखे माणसे गिळण्याचे काम करतंय, असेही ते म्हणाले. शहरातील प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक पाच मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कसबा बावड्यातील भाजी मंडई चौकात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
या सभेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, महायुतीवर चौफेर हल्ला चढवला. राजसत्ता, पोलिसांची सत्ता वापरून लोकशाही गुंडाळून ठेवत आणि राजकारणाचा तमाशा करत नगर परिषदांच्या निवडणुका जिंकल्याचा घणाघाती आरोप सपकाळ यांनी केला आहे.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी, महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपण लोकाभिमुख जाहीरनामा घेवून लोकांच्या समोर आलोय. मात्र विरोधक केवळ टीकाच करत असल्याचे त्यांनी सांगितले. एखादे आश्वासन दिले तर ते पूर्ण करण्याची धमक महायुतीच्या स्थानिक नेत्यांच्यात नाही म्हणून ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आणून मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या स्थानिक नेत्यांना टोला लगावला. या निवडणुकीत माझ्या कुटुंबातील सदस्यांना नव्हे तर, सर्वसामान्य कार्यकर्त्याला रिंगणात उतरवले असून आणि त्यांच्यासाठी पायाला भिंगरी बांधून प्रचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकेकाळी कोल्हापूरचा महापौर शिरोलीतून ठरत होता पण कोल्हापूरचे १० महापौर माझ्या अजिंक्यतारा कार्यालयातून ठरवण्याचा आणि करण्याचा इतिहास केलाय, असे त्यांनी सांगितले. आपल्याला सत्तेचा मुकुट नव्हे तर जनतेचे प्रेम महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी, उठसुठ सतेज पाटील यांच्यावर टीका करणाऱ्यांनी सत्ता असताना कोल्हापुरसाठी काय केलं? असा प्रश्न उपस्थित करत १०० कोटीच्या रस्त्यातील पैसे खाणारा जयकांत शिखरे कोण ? अशी विचारणा केली
डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांनी, निवडणुका आल्या की विरोधक नेहमी आमच्या शिक्षण संस्था, हॉटेल आणि हॉस्पिटल यावर टीका करतात पण आम्ही शिक्षण संस्था, हॉटेल आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार देण्याचे काम करत लोकांची सेवा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक प्रचारातील ही शेवटची ओव्हर आहे. आमदार सतेज पाटील यांच्यासारखे पॉवर हीटर बॅट्समन आपल्याकडे आहेत आणि ते चौकार आणि षटकार मारणार असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी, या निवडणूकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. या सभेत प्रा. उदय नारकर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख राहुल माळी, आदित्य कांबळे, राहुल आळवेकर, रूपाली पोवार, आनंदा करपे, सचिन चौगले यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी आमदार जयंत आसगांवकर, डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, पूजा पाटील, कॉम्रेड दिलीप पोवार, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, श्रीराम सोसायटीच्या चेअरमन शीतल पाटील, व्हाईस चेअरमन सुभाष गदगडे, प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार सुभाष बुचडे, सचिन चौगले, पुष्पा नरूटे, रूपाली पोवार, प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार विनायक कारंडे, अर्जुन माने, सरोज सरनाईक, स्वाती येवलुजे यांच्यासह प्रभाग क्रमांक एक आणि पाच मधील माघार घेतलेले महाविकास आघाडीचे उमेदवार, श्री राम सोसायटीचे सर्व संचालक, आजी-माजी नगरसेवक आणि कसबा बावड्यातील नागरिक उपस्थित होते.