शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ४९ हजार ९०२ जणांना पदवी प्रदान

<p>शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ४९ हजार ९०२ जणांना पदवी प्रदान</p>

कोल्हापूर – शिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि उत्कृष्टता ही २१ व्या शतकातील यशाची प्रमुख सूत्रे आहेत. याचा वापर करून तुम्ही नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे बना, असे आवाहन एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी केले. ते  आज शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते.

शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात दीक्षांत समारंभ आयोजीत करण्यात आला होता. सुरवातीला प्र कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी वार्षिक अहवाल सादर करत शिवाजी विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला.

डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी, आपण देशाच्या इतिहासातील एका निर्णायक टप्प्यावर उभे आहे. राष्ट्र निर्मिती आणि समाजाप्रती आपली मोठी जबाबदारी आहे. यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन त्यांनी केले. समस्येकडे पाहून नाविन्यपूर्ण उपाय शोधणे अत्यावश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंडस्ट्री तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने तंत्रज्ञान बदलत आहे. या सकारात्मक बदलाचा उपयोग करून मानवी जीवन अधिक सुलभ आणि समृद्ध करण्याचे ध्येय ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्या हस्ते अक्षय अरुण नलवडे या विद्यार्थ्याला राष्ट्रपती सुवर्ण पदक तर आर्या संजय देसाई हिला कुलपती सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. यासह १६ स्नातकांना पारितोषिक आणि ४१ जणांना पीएचडी पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी  ४९ हजार ९०२ मधील १६ हजार १५९ जणांना प्रत्यक्ष उपस्थितीत पदवी, पदविका प्रमाणपत्रे देण्यात आली.