त्याग व समर्पणातूनच सर्वोच्च शिखर गाठता येते – मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.
कोल्हापूर : जिद्द, कष्ट, त्याग, प्रेरणा आणि समर्पण यांच्या जोरावरच जीवनात कोणतेही यश प्राप्त होते. कठोर परिश्रम आणि शिस्तीबरोबर त्यागाची जोड मिळाल्यास सर्वोच्च शिखर गाठता येते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले. जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलींच्या खो-खो संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, उपप्राचार्या व्ही. ए. खडके, प्रशिक्षक बी. आर. भांदिगिरे, तसेच क्रीडा शिक्षक प्रा. बी. पी. माळवे उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, “राज्यस्तरावर मिळवलेल्या सुवर्णयशाने शाळेचे, जिल्ह्याचे आणि विभागाचे नाव उज्ज्वल झाले आहे. पुढील काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही निश्चितच चमकाल, अशी अपेक्षा आहे.” त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. शेंडकर म्हणाल्या की, “जीवनातील सर्व काही पैशांनी विकत घेता येते; परंतु जिद्द, इच्छाशक्ती, त्याग आणि समर्पण विकत मिळत नाही. हीच गुणवैशिष्ट्ये जीवनात यश मिळवून देतात.” प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीच्या जोरावर मुलींनी राज्यस्तरीय सुवर्णपदक जिंकून दाखवले, असे त्या म्हणाल्या.
प्राचार्य डॉ. खाडे यांनी, शाळेचा शैक्षणिक व क्रीडा वारसा उलगडला. जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय प्रवासात संघाने केलेल्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला. तसेच खासदार श्रीमंत शाहू महाराज, जिल्हा प्रशासन, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, पालक व प्रशिक्षक यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
क्रीडा शिक्षक प्रा. माळवे यांनी राज्यस्तरीय स्पर्धेतील संघाच्या कामगिरीची माहिती दिली. संघाची कर्णधार अमृता पाटील हिनेही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. सुषमा पाटील यांनी, तर आभारप्रदर्शन यादव यांनी केले. सर्व सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमापूर्वी कोल्हापूर शहरातून काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.