माजी विद्यार्थी हे आमच्या संस्थेचे खरे ब्रँड ॲम्बेसेडर : डॉ. संजय डी. पाटील
लंडन येथे डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात...
कोल्हापूर – माजी विद्यार्थ्यांनी जगभरात आपल्या कामातून संस्थेचा गौरव वाढवला ही अभिमानाची गोष्ट आहे. माजी विद्यार्थी हे आमच्या संस्थेचे खरे ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचे प्रतिपादन डॉ. संजय डी. पाटील यांनी केले.कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा लंडन येथे उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त तेजस सतेज पाटील यांनी या मेळाव्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लंडनस्थित गडहिंग्लजचे सुपुत्र कोका कोलाचे संचालक राजेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
लंडन येथील पार्क प्लाझा व्हिक्टोरिया येथे झालेल्या या मेळाव्यात नोकरी तसेच व्यवसायानिमित्त लंडनमध्ये कार्यरत असलेले ४५ माजी विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे तसेच इंग्लंड शासनात विविध पदावर असणारे माजी विद्यार्थी यांचा समावेश होता. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाच्या उच्चतम शैक्षणिक गुणवत्तेमुळे आपण चांगली प्रगती करू शकल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. संस्थेचा विस्तार व प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करत महाविद्यालय आणि संस्थेचे संस्थापक डॉ.डी. वाय.पाटील तसेच अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांच्याबाबत विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, डी. वाय .पाटील ग्रुपचे अनेक माजी विद्यार्थी आज जगभरात विविध देशात मोठ्या पदावर काम करत आहेत, याचे समाधान वाटते. डी. वाय.पाटील दादांनी दूरदृष्टीने १९८४ मध्ये संस्था स्थापन केली. संस्थेच्या विकासात आमच्या माजी विद्यार्थ्यांचेही मोठे योगदान आहे. यापुढेही या विद्यार्थ्यांनी संस्थेशी सहयोग आणि संपर्क ठेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विश्वस्त तेजस पाटील म्हणाले, गेल्या चार दशकाहून अधिक काळ अष्टपैलू विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था कार्यरत आहे. माजी विद्यार्थी हे आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत. यापुढील काळातही माजी विद्यार्थी व संस्था यांच्यातील हे नाते दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील.
प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी प्रास्ताविक केले. आभार संचालक डॉ. अजित पाटील यांनी मानले तर केमिकल विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव यांनी स्वागत केले.
चेतन ओझा,मेनका भारद्वाज,ऋषिकेश देशपांडे, संदीप पाटील, निकेत साबळे, अल्ताफ जसनाईक, प्रीती रणभिसे, ऋतुजा पाटील, सूरज पाटील या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केले. संस्थेने आम्हाला घडवले, आत्मविश्वास दिला आणि जगात ओळख निर्माण करण्याची संधी दिली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मेळावा नियोजनासाठी माजी विद्यार्थी विभाग समन्वयक डॉ. मनीषा भानुसे, माजी विद्यार्थी साईदत्त सबनीस, अरिहंत आडके यांनी विशेष परिश्रम घेतले .