अंगणवाडी सेविकेचा मुलगा बनला क्लासवन अधिकारी
									
																		
																											 
																	इचलकरंजी – घरात फक्त दहा बाय दहाची खोली, वडिलांचं लहान वयात निधन, आई अंगणवाडी सेविका अशा प्रतिकूल परिस्थितीतूनही तन्मय मांडरेकर या युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवून इतिहास रचला आहे. तन्मयचं हे यश इचलकरंजी शहरासह संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
तन्मय यांची आई राधिका मांडरेकर या गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. अल्प उत्पन्नात त्यांनी मुलांना शिक्षण देत, संकटांशी सामना करत, त्यांना अधिकारी बनवण्याचं स्वप्न जोपासलं. तन्मय यांनी कोणत्याही खासगी क्लासशिवाय, केवळ स्वअभ्यास, वृत्तपत्रांचा अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात गटविकास अधिकारी (BDO) पद मिळवलं.
तन्मय यांनी दहावीमध्ये 98 टक्के गुण, बारावी आणि अभियांत्रिकी शिक्षणात उत्तम कामगिरी केली. लहानपणी दहावीच्या सुट्टीत बसस्थानकावर पेन विकून घरखर्चाला हातभार लावणारा हाच मुलगा आज राज्यसेवेतील क्लासवन अधिकारी बनला आहे. त्यांच्या या यशानं इचलकरंजी शहर उजळलं असून तन्मय सध्या पुण्यातील यशदा येथे प्रशिक्षण घेत आहेत. “आईच्या आशीर्वादामुळे आणि सततच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळालं,” असं तन्मय यांनी सांगितलं. तन्मय मांडरेकर यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर मेहनत, जिद्द आणि आईच्या त्यागाचं प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.
