चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांबाबत शिक्षकांसह विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी

सध्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. नव्या निर्णयानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीसाठी सुध्दा ही परीक्षा घेतली जाणााराय. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर प्राथमिक स्तर पाचवी पर्यंत आणि उच्च प्राथमिक स्तर आठवीपर्यंत वाढवण्यात आलाय. त्यामुळं शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि सातवी ऐवजी पाचवी आणि आठवीसाठी घेण्याचा निर्णय झाला. आता पुन्हा चौथी आणि सातवीसाठी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. म्हणजे यावर्षी चौथी, पाचवी आणि सातवी, आठवी या चारही इयत्तांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणाराय. तर पुढील वर्षापासून फक्त चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणाराय. हा निर्णय जरी स्वागतार्ह असला तरी शैक्षणिक मध्यावर घेतल्यानं शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येणाराय.
हा निर्णय शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला झाला किंवा पुढच्या वर्षांपासून याची अंमलबजावणी करण्यात आली असती तर विद्यार्थी, शिक्षक, पालकांना व्यवस्थित नियोजन करता आलं असतं. यापुढं तरी शासनानं असे अचानक निर्णय लादू नयेत हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येतीय