प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचे शिवाजी विद्यापीठात औपचारिक स्वागत

कोल्हापूर – "सुसंवाद, विश्वास आणि पारदर्शकता या त्रिसूत्रांवर आधारित कार्यशैली ठेवून शिवाजी विद्यापीठाचा शैक्षणिक व सामाजिक लौकिक अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया," असे आवाहन नवनियुक्त प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आज विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारताना केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असलेले डॉ. गोसावी यांनी आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर लगेच त्यांनी विद्यापीठाच्या विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधत कामकाजाला सुरुवात केली. व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात आयोजित स्वागत समारंभात कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन कुलगुरू डॉ. गोसावी यांचे सपत्नीक स्वागत करण्यात आले.
डॉ. गोसावी आपल्या भाषणात म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव लाभलेले, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा लाभलेले हे विद्यापीठ आज ७५ वर्षांचा गौरवशाली टप्पा पार करत आहे. याचा भाग होण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे." शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळवले आहे, याचा उल्लेख करत, हा लौकिक आणखी उंचावण्यासाठी सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सकारात्मक व पारदर्शकतेवर आधारित वातावरण निर्माण करावे, असे त्यांनी शेवटी नमूद केले.