शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं...

कुलगुरूं विना विद्यापीठ "शिवाजी विद्यापीठाची” अवस्था

<p>शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं...</p>

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ सहा ऑक्टोबर रोजी संपला आहे. कुलपती कार्यालयाने कुलगुरू शोध प्रक्रियेची सुरुवात मागील सहा महिन्यापूर्वी केली होती. यानंतर समिती स्थापन होऊन कुलगुरू पदासाठी अर्ज मागवण्यासाठी जाहिरात देणे अपेक्षित होते. मात्र सध्या तरी अशी कोणतीच प्रकिया सुरु असल्याचे दिसत नाही. नव्या कुलगुरुंच्या नियुक्तीसाठी अजून काही कालावधी लोटण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभारी कुलगुरूंची नेमणूक होणे गरजेचे असताना त्यासाठी हालचाली होताना दिसत नाहीत. सध्या शिवाजी विद्यापीठाचे कामकाज सुरु आहे. या दरम्यान जर एखादी मोठी घटना घडली किंवा निर्णय घेण्याची वेळ आली तर सर्व प्रशासकीय अधिकारी एकमेकांकडे बोट करून मोकळे होतील.

दुसरीकडे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २८३ महाविद्यालये आणि त्यामध्ये शिकणाऱ्या 1 लाख ८५ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा सुद्धा प्रश्न   आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना सुद्धा या संदर्भात आवाज उठवू लागल्या आहेत. शाहू सेनेच्या वतीने प्रभारी कुलगुरुंची तात्काळ नियुक्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या आजवरच्या इतिहासात वेळेत कुलगुरू नेमले गेले आहेत किंवा प्रभारी कुलगुरुंची नेमणूक करण्यात आलीय. पण यंदा मागील ६३ वर्षाची परंपरा खंडित झालीय. सध्या प्रभारी कुलगुरु पदासाठी डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर के कामत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवार यांच्या नावांची चर्चा आहे. मूल्यांकन प्रक्रियेची माहिती असणाऱ्या कुलगुरूंकडे प्रभारी कुलगुरुंची सूत्रं सोपवली जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.