राजर्षी शाहू शिष्यवृत्ती सराव परीक्षे’चा निकाल आता लागणार 'सुपरफास्ट'
कोल्हापूर - शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत कोल्हापूर महानगरपालिकेने संपूर्ण राज्यात एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने आयोजित शहरस्तरीय 'राजर्षी शाहू शिष्यवृत्ती सराव परीक्षा' अंतर्गत पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी जरग विद्यामंदिर येथे घेण्यात आली. या परीक्षेस शहरातील मनपाचे 650 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत. या पहिल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल पारंपारिक पद्धतीला फाटा देत अत्याधुनिक मोबाईल अॅपच्या माध्यमातून अवघ्या एका तासात जाहीर करण्यात आला. असा प्रयोग करणारी कोल्हापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महानगरपालिका ठरणार आहे.
या नाविन्यपूर्ण प्रयोगांतर्गत शिक्षकांनी अॅपच्या सहाय्याने उत्तरपत्रिका स्कॅन केल्यामुळे मानवी त्रुटी दूर होऊन निकाल अत्यंत पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने तयार झाला. विशेष म्हणजे, विद्यार्थ्याचा प्रश्ननिहाय निकाल pdf स्वरूपात पालकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला आहे. यामुळे पालकांना आपल्या पाल्याची प्रगती तात्काळ पाहता येत आहे. या तंत्रज्ञानामुळे कोणत्या प्रश्नांची उत्तरे मुलांची जास्त प्रमाणात चुकली आहेत, याचे अचूक विश्लेषण प्रशासनाला मिळाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नेमका कोणता घटक समजलेला नाही हे शिक्षकांना कळणार असून, त्यावर आधारित विशेष मार्गदर्शन करणे अधिक सोपे होणार आहे.
यातील यशस्वी विद्यार्थ्यांना मनपाकडून प्रतिवर्षी २,४०० रुपये अशी दोन वर्षांची एकूण ४,८०० रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. विशेष म्हणजे, अशी थेट आर्थिक मदत देणारी आणि शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत चमकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'इस्रो' (ISRO) सहलीचे आयोजन करणारी कोल्हापूर ही महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका आहे.
हा संपूर्ण उपक्रम कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मान. के. मंजूलक्ष्मी आणि उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांनी या आधुनिक परीक्षेचे नेटके नियोजन केले आहे. परीक्षा विभागाचे कामकाज शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, बाळासो कांबळे, चंद्रकांत कुंभार, संजय शिंदे, परीक्षा केंद्र प्रमुख नीता ठोंबरे आणि तंत्रस्नेही शिक्षक सुभाष मराठे, किरण माळी, संदिप जाधव,नेताजी फराकटे, सुशील जाधव व टीम यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले.