कोल्हापूरच्या अकरा NCC विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिन परेड शिबिरासाठी निवड
कोल्हापूर – कोल्हापूर एनसीसी ग्रुप मुख्यालयाच्या अंतर्गत ११ विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिन परेड (2026) शिबिरासाठी निवड झाली आहे. या तुकडीत ५ विद्यार्थी व ६ विद्यार्थीनींचा समावेश आहे. राज्यभरातून या शिबिरासाठी १२७ एनसीसी विद्यार्थी सहभागी झाले असून, कोल्हापूर मुख्यालयासाठी ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सीनियर अंडर ऑफिसर हिमेश राठोड, रिद्धी पदमुखे, सर्जंट राधिका क्षत्रिय (डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी), मधुरा बाटे (न्यू कॉलेज कोल्हापूर), सिनी. अंडर ऑफिसर ओंकार पवार (वाय.सी.कॉलेज ऑफ सायन्स, कराड), प्रसाद वांगेकर (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कराड), प्रमोद चव्हाण, सुष्मिता राठोड (आर.पी. गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी), ज्युनियर अंडर ऑफिसर तनिष्का चव्हाण (सी.एस. कॉलेज, सातारा), निशांत चव्हाण (विलिंग्डन कॉलेज, सांगली), सृष्टी पाठक (महावीर कॉलेज, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
हे विद्यार्थी कोल्हापूर व पुणे एनसीसी ग्रुप मुख्यालयात पार पडलेल्या कठीण स्पर्धात्मक प्रक्रियेत यशस्वी ठरले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे प्रतिनिधित्व करत नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेड शिबिर (२९ डिसेंबर २०२५ ते २९ जानेवारी २०२६) मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच २६ जानेवारी २०२६ रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या एनसीसी रॅली परेडमध्ये देखील हे विद्यार्थी सहभागी होतील.
ब्रिगेडियर आर.के. पैठणकर, ग्रुप कमांडर, एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर यांनी निवड झालेल्या कॅडेट्स व त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.