राहुल गांधी म्हणतायत तर.....
Share
सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणूक निकालांनंतर सर्वाधिक आत्मपरिक्षणाची गरज असलेल्या काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा दिला. कार्यकारिणीनं हा राजीनामा नाकारलाय. पण खुद्द राहुल गांधी घराणं सोडून अध्यक्ष करावा या मुद्यावर ठाम आहेत. राहुल गांधींची भूमिका काँग्रेसींना न पटणं हे अपेक्षितच आहे.पण अनेकांना राहुल असा काही निर्णय घेतील हे मात्र न पटणारं आहे. पण अनेकांना राहुल गांधींच्या या निर्णयात काँग्रेसचं हित दिसतंय. काँग्रेस पक्षाचा म्हणून एक स्वभाव आहे त्यानुसार गांधी घराण्या वरील निष्ठा ही काँग्रेसी असण्याचं मेरीट समजलं जातं. तसं असण्यात गैर काहीच नाही पण अनेक गांधीनिष्ठांनी पक्षनिष्ठा बासनात गुंडाळल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळंच काँग्रेस आजच्या स्थितीत पोहचलाय आहे. बहुतांश काँग्रेसजनांना हे कळतंय पण वळत नाही अशी स्थिती आहे. पंडित नेहरुंनी स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून भारताच्या उभारणीत दिलेलं योगदान, इंदिरा गांधींचं बलिदान, राजीव गांधींचं बलिदान याच्या पलिकडं ज्यावेळी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होतो त्यावेळी मात्र काँग्रेसकडं सबळ उत्तर असत नाही.आज राहुल गांधींनी जो निर्णय घेतलाय त्यातून काँग्रेसला ही खरं तर या आरोपातून मुक्त होण्याची संधी आली आहे. वर्कींग कमिटी बैठकीत सर्वांनीच अपयशाचं खापर राहुल गांधींवर फोडून उपयोग नाही असं सांगत त्यांनी अध्यक्षपद सोडू नये असा आग्रह धरलाय. यातून पुन्हा एकदा कार्यकारिणीची गांधी निष्ठाच दिसून येतीय. यावरुन पक्षाची इतकी वाताहात होऊन सुध्दा काँग्रेसींना जाग येत नाही याचंच आश्चर्य वाटतं. राहुल गांधी केवळ अध्यक्षपद सोडतायत पक्ष नव्हे हे लक्षात घेऊन काँग्रेस कार्यकारिणीनं एक धाडसी पाऊल उचललं तर ते कदाचित फायद्याचं ठरेल. राहुल गांधींचा हा निर्णय पक्षातील कार्यकर्त्यांसाठी धक्का असेल असं सांगत माजी केंद्रीयमंत्री पी चिदंबरम यांनी कार्यकर्ते आत्महत्या करतील असं भावनिक वक्तव्य केलंय. त्यांची भावना रास्तच आहे. पण असे पक्षनेतृत्वासाठी मरायला तयार असणारे कार्यकर्ते पक्षाचा विचार येतो त्यावेळी गलितगात्र का होतात असा प्रश्न सामान्यांना पडल्या शिवाय राहत नाही. असे कार्यकर्ते असतील तर पक्षाला आज हे दिवस का बघायला मिळाले असाही मुद्दा उपस्थित होता. अध्यक्ष बदल झालाच तर चिदंबरम म्हणतायत तसं होऊ नये ही अपेक्षा. कदाचित काही अंशी कार्यकर्ते नाराज होतील पण दुसरीकडं भाजपाला राहुल गांधींचा हा असा निर्णय अपेक्षित नसल्यामुळं त्यांच्यासाठी मात्र तो धक्का असेल.
भाजपा कडून किंवा खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधींचं जे प्रतिमा हनन करण्यात आलंय त्यातून राहुल यांचं प्रतिमा संवर्धन करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यात फारसा बदल होत नाही असं चित्र आहे. त्यामुळं अध्यक्ष बदलानंतर या आरोपांची धार सुध्दा कमी होईल. क्रिकेट सारख्या खेळाचं उदाहरण घेतलं तर काही सामन्यांमध्ये रणनितीचा भाग म्हणून क्षेत्ररक्षण करणारा संघ धावा न करणार्या फलंदाजाला बाद करण्यासाठी फारसे कष्ट घेत नाही.त्याचं पीच वर राहणं हे समोरच्या संघासाठी फायद्याचं ठरतं.धावा न करणार्या फलंदाजाला बाद करुन नव्यानं येणार्या आक्रमक फलंदाजाला संधी देण्या पेक्षा आहे त्यालाच खेळवत राहणं त्या संघाच्या हिताचं असतं. आज भाजपासाठी राहुल गांधींची स्थिती अशीच धावा न करणार्या फलंदाजा सारखी आहे. त्यामुळं त्यांच्या जागी दुसरा कुणी येणं हे भाजपासाठी काही अंशी का होईना त्रासदायक ठरेल. पण काँग्रेसनंच जर राहुल गांधींनाच पीचवर ठेवायचा निर्णय घेतला तर तो निर्णय भाजपासाठी फायद्याचाच आहे.
काँग्रेस सारख्या मोठी परंपरा, व्याप्ती आणि ताकद असणार्या पक्षांनं आता एका घराण्यावर अवलंबून राहून किती दिवस राजकारण करायचं याचा सुध्दा विचार करण्याची गरज आहे. गांधी घराण्यानं देशासाठी आणि पक्षासाठी दिलेलं योगदान निश्चितच महत्त्वाचं आहे. त्या योगदानाबद्दल देश आणि पक्ष कृतज्ञच राहिल पण आता काळाची मागणी असेल तर बदल करण पक्षाच्या फायद्याचं ठरणार आहे.कदाचित नेतृत्वबदलातून फायदा झालाच नाही तर पुन्हा राहुल आणि प्रियांका हे पर्याय पक्षाकडं आहेतच.
राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठामच राहिले आणि कार्यकारिणीनं नेतृत्व बदलाचा निर्णय घेतलाच तर अध्यक्षपदासाठी नव्या दमाच्या नेत्याचा विचार व्हावा. काँग्रेसच्या दरबारी राजकारणा नुसारच नेता निवडला तर काँग्रेस एक चांगली संधी गमावेल. अध्यक्ष निवडताना गांधीनिष्ठ या एकाच मेरिटचा विचार झाला तर पुन्हा घातच होईल. त्याऐवजी जुन्या नव्यांची सांगड घालत आज मोठ्या संख्येनं असलेल्या देशातील तरुणाईला आपलं वाटेल. पक्षापासून दुरावलेल्या विविध घटकांना नवा विश्वास देईल अशाच नेतृत्वाचा विचार होणं गरजेचं आहे. अध्यक्षपदासाठी साठी सत्तरी ओलांडलेल्या अनुभवींचा विचार झाला तर त्याचा फारसा फायदा होईल असं वाटत नाही.
कालच्या संपादकीयात आपण चेहरा हाच पर्याय ठरु शकतो अशी चर्चा केली होती. राहुल गांधींच्या भूमिकेमुळं आश्वासक चेहरा देण्याची संधी मिळाली आहे. कारण भाजपाला मिळालेल्या यशात त्या पक्षाची विचारधारा, पक्षाची आणि सरकारची धोरणं याच्या पेक्षा नरेंद्र मोदींचा चेहर्याचा खूप मोठा वाटा आहे. आज काँग्रेसला अशाच चेहर्याची गरज आहे. काँग्रेसनं आता पारंपरिक पठडी सोडून संघटनात्मक पातळीवर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पक्षाच्या सुदैवानं पक्षाध्यक्ष राहुल गांधींनीच त्या दिशेनं एक स्वागतार्ह पाऊल टाकलं असून कार्यकारिणीनं राहुल गांधींवर खरंच प्रेम असेल तर या निर्णयाचा स्विकार केला तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता वाढेल. स्वत: राहुल गांधी म्हणतायत तर पक्षानं एकदा नेतृत्वासाठी गांधी घराण्या शिवायच्या नावाचा विचार करावाच.