एलसीबी ग्रोबझ फसवणूक प्रकरणी फरार असलेला सोमनाथ कोळीला बेळगावमधून अटक
कोल्हापूर – शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०२१ मध्ये विश्वास कोळी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून ग्रोबझ ट्रेडिंग कंपनी स्थापन केली होती. या कंपनीकडून दरमहा १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. मात्र, गुंतवणूकदारांना वेळेत परतावा न दिल्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये गुंतवणूकदारांनी या कंपनीचा संचालक विश्वास कोळी याच्यासह त्याच्या अन्य २३ साथीदारांवर शाहूपुरी पोलिसात आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा शाहूपुरी पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. दरम्यान यातील १८ आरोपींना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. मात्र अद्याप ५ आरोपी फरार आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विश्वास कोळी याच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने तपासातील त्रुटी बद्दल तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि शैलेश बलकवडे यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते. यानंतर आता पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून गेल्या तीन वर्षापासून फरार असणारा सोमनाथ कोळी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज बेळगाव मधून अटक केली ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, अमित सर्जे, सुशील पाटील, शुभम संकपाळ, अनिल जाधव , संजय पडवळ, संजय हंबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.