शिरगाव बाजारपेठेत चोरट्याचा धुडगूस...

सहा दुकाने फोडली...

<p>शिरगाव बाजारपेठेत चोरट्याचा धुडगूस...</p>

कोल्हापूर - ऊस तोडणी हंगाम सुरू झाल्यानंतर राधानगरी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीय. तालुक्यातील शिरगाव येथे  आज पहाटेच्या सुमाराला अज्ञात चोरट्याने तब्बल सहा दुकाने फोडून रोख रक्कम आणि साहित्य लंपास केले आहे. शिरगाव-आमजाई -व्हरवडे मार्गावरील रियाज पंक्चर हे दुकान फोडून चोरट्याने टॉमी घेऊन इतर दुकानातून साहित्य चोरले आहे. त्यानंतर शेजारील रसवंती गृहाचे पत्रे उचकटून दुकानात प्रवेश करत एक हजार रुपयांची रोकड लंपास केलीय.

लक्ष्मी ट्रेडर्स या दुकानाच्या मागील बाजूने पत्र्याचे स्क्रू काढून आत प्रवेश करत चोरट्याने रोख रक्कम लंपास करून साहित्याचे नुकसान केले आहे. त्यानंतर चोरट्याने साई बाजारचे शटर उचकटून कॅश काउंटरमधील सुमारे १८ हजार रुपयांची रोकड आणि किरकोळ साहित्य लंपास केले आहे. चोरट्याने सुटे पैसे असलेली पिशवी फोडून ते पैसे विस्कटले. गुडाळेश्वर बाजार आणि महालक्ष्मी बेकर्स या दुकानांनाही चोरट्याने लक्ष्य केले आहे. चोरट्याच्या हालचाली दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्या आहेत.

चोरटा बिनधास्तपणे दुकाने फोडताना, रस्त्यावर फिरताना सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित दुकान मालकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी रात्र गस्त घालण्यास सुरू करावी, अशी मागणी शिरगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केलीय.

राधानगरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथक आणि ठसे तज्ञांच्या मदतीने सीसीटीव्हीमधील चित्रीकरणाच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु केला आहे.