रेकॉर्डवरील दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक... 34 मोटार सायकली जप्त
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रेकॉर्डवरील दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. संग्राम शिवाजी गायकवाड असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे सतरा लाख रुपये किंमतीच्या चोरीच्या चौतीस मोटर सायकली जप्त केल्या आहेत. या गुन्ह्यात चोरीच्या मोटर सायकली खरेदी करणाऱ्या चौघांना देखील यात आरोपी करण्यात आले आहे, असे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितले आहे.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी, जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष पथक नेमुन दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्यात. या अनुषंगाने तपास करताना आज रेकॉर्डवरील दुचाकी चोरटा चोरीची मोटर सायकल विक्री करण्यासाठी हेरले गावात आला असता त्याला अटक करण्यात आली आहे. संग्राम शिवाजी गायकवाड असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 17 लाख रुपये किंमतीच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ, भुदरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार, कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन, आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन अशा एकूण 34 चोरीच्या मोटर सायकली जप्त केल्या आहेत. चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या चौघांना देखील यात आरोपी करण्यात आलंय. अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, रामचंद्र कोळी, नवनाथ कदम, विनोद कांबळे, संजय पडवळ, अरविंद पाटील, अनिल जाधव, राजेंद्र वरंडेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे.