भोगावती नदीपात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह; करवीर पोलिसांकडून ओळख पटविण्याचं आवाहन
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील खुपिरे येथील भोगावती नदीपात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय. करवीर पोलीस ठाण्यातील माहिती नुसार दि. २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मृतदेह तरंगत्या अवस्थेत मिळून आला. विलास पाटील यांच्या मळीच्या शेताजवळील जॅकवेल परिसरात हा मृतदेह आढळला. यासंदर्भात शिवाजी धोंडीराम गुरव (वय ५५, रा. करवीर) यांच्या वर्दीवरून करवीर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आलाय.
मृत व्यक्ती अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाचा असून उंची ५ फूट ४ इंच आहे. मध्यम अंगकाठी, अर्धवट उघडे व बाहेर आलेले डोळे, ठिकठिकाणी सोललेली त्वचा, बहुतांश गळलेले केस, निळसर रंगाचा कॉलर असलेला हाफ टी-शर्ट, गडद हिरव्या रंगाची जीन्स पॅन्ट, काळा व तपकिरी रंगाचा बेल्ट, गडद निळ्या रंगाची ESSOEE स्टीकर असलेली इलास्टिक अंडरविअर, लाल-निळ्या चेक्सचा रुमाल, लाल रंगाचे सॅंडो बनियान असा पेहराव आहे. करवीर पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना पुढ येण्याचं आवाहन केलंय. या व्यक्तीबद्दल कोणाला माहिती असल्यास करवीर पोलीस ठाण्याशी किंवा पोहेकॉ एस. पी. जाधव (मो. ९०११०७१९१५) यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन करवीर पोलिसांकडून करण्यात आलंय.