जैनापुरमध्ये बनावट खत कारखान्यावर धाड २८ लाखांचा मुद्देमाल जप्त; पुण्यातील युवक अटकेत
शिरोळ : जैनापुर येथील श्रीकृष्ण प्रभाकर पटवर्धन यांच्या शेतातील घरात विनापरवाना सुरू असलेल्या बनावट खत उत्पादनावर कृषी विभागाने बुधवारी संध्याकाळी कारवाई केली. या छाप्यात विविध १५ प्रकारच्या खतांचा २८ लाख ४० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अनय प्रशांत घुणागे (वय २१, रा. हडपसर, पुणे) या युवकाविरुद्ध जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अनुप सूर्यकांत रासकर यांनी फिर्याद दिली.
कृषी विभागाच्या पथकाला जैनापुर येथे बेकायदेशीर खत उत्पादन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान विनापरवाना उत्पादन, प्रयोगशाळेचा अभाव, अस्तित्वात असलेल्या कंपन्यांच्या नावाने बनावट उत्पादन, चुकीची व अपूर्ण लेबलिंग अशा अनेक अनियमितता उघडकीस आल्या. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात तयार खत, कच्चा माल, पॅकिंग साहित्य आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे १५ प्रकारचा साठा जप्त करण्यात आला. अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत.