इचलकरंजीत चिमुकलीची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ...
संतप्त जमावाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
कोल्हापूर - मालेगाव मधील अत्याचाराची घटना ताजी असून त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. अशातच इचलकरंजी शहरात एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार घडलाय.
संशयित आरोपी बाबासाहेब बाणदार याचे घरातच किराणा दुकान आहे. काल सायंकाळच्या सुमारास अल्पवयीन पीडित मुलगी खाऊ घेण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला दुकानातून घरात बोलावून घेऊन तिच्याबरोबर लज्जास्पद वर्तन केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरात सुरुवातीला काहीही सांगितले नाही. मात्र आईने तिला विश्वासात घेऊन पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर तिने संपूर्ण हकीकत उघड केली. त्यानंतर पीडितेची आई कोणताही विलंब न लावता तक्रार देण्यास शहापूर पोलीस ठाण्यात गेली असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. अश्लील वर्तन करणाऱ्या नराधमावर कारवाई न करता पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शहापूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर बी.एन.एस. कलम ७३ सह बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत आरोपी बाबासाहेब बाणदार याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पीडित कुटुंबाने हिंदुत्ववादी संघटनांना याची माहिती दिली. त्यानंतर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला आणि पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांचा निषेध करत त्यांना धारेवर धरले. त्याचबरोबर संशयित आरोपी बाबासाहेब बाणदार याच्या राहत्या घराची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी, पीडित मुलीच्या नातेवाईकांशी संवाद साधला आणि त्यानंतर शहापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिस प्रशासनाला धारेवर धरले. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी करत त्यांच्या कारभाराची तक्रार मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले.