चुटकी बाबा सापडला... न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी...
कोल्हापूर - गुप्तधन मिळवून देतो,भूतबाधा दूर करतो,लग्न जुळवून देतो असे आमिष दाखवून लोकांची आर्थिक लुबाडणूक करणारा चुटकी बाबा सनी भोसले अखेर सापडला आहे.
गणेश काटकर याच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. करवीर पोलिसांनी नाना पाटील नगर परिसरात भरणाऱ्या चुटकी बाबाच्या दरबारावर छापा टाकला. मात्र याठिकाणी पोलिसांना केवळ अंगारा धुपारा, काळ्या बाहुल्या मिळून आल्या होत्या पण सनी भोसले पसार झाला होता. करवीर पोलिसांनी तीन दिवस सातारा, वाई, पुणे, मुंबई असा पाठलाग करत आज चुटकी बाबा सनी भोसले याला ठाणे येथून ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.