पन्हाळा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला त्रास; तरुणाला पोक्सो गुन्ह्यात अटक

<p>पन्हाळा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला त्रास; तरुणाला पोक्सो गुन्ह्यात अटक</p>

कोडोली – पन्हाळा तालुक्यातील संजय भगवान देवकुळे (वय 25) या तरुणाला अल्पवयीन मुलीला सातत्याने त्रास देत धमक्या दिल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत कोडोली पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय देवकुळे हा मागील दोन वर्षांपासून पीडित अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करत होता. 16 ऑगस्ट 2023 रोजी त्याने मुलीच्या आजोबांच्या मोबाईलवर फोन करून “माझ्याशी मैत्री व प्रेमसंबंध ठेवा, नाहीतर मी आत्महत्या करीन किंवा तुझ्या कुटुंबाला इजा करीन” अशी धमकी दिली होती. यानंतर, 2024 साली आरोपीने रस्त्यात अडवून मुलीला घड्याळ भेट दिल्याचा प्रकार घडला. मात्र त्रास थांबण्याऐवजी तो अधिकच वाढला. 1 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीने पीडितेच्या मोबाईलवर फोन करून “तू मला आवडतेस, तुझ्याशी लग्न करायचे आहे, प्रेमसंबंध ठेव नाहीतर मी स्वतःचे नुकसान करीन” अशी धमकी दिली. तसेच कुटुंबाला जातीवाचक गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिली.

वारंवार होत असलेल्या या प्रकारामुळे मुलीच्या आईने अखेर कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी संजय देवकुळे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोक्सो, धमकी देणे आणि संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास कोडोली पोलिस करत आहेत.