मद्यधुंद मोटारचालकाची गंगावेशमध्ये भीषण धडक; दोन जण जखमी, संतप्त जमावाकडून चालकाला मारहाण
कोल्हापूर – मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असलेल्या मोटारचालकाने भर चौकात नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना जबर धडक दिल्याची घटना गंगावेश येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून संतप्त जमावाने मद्यधुंद चालकाला बेदम मारहाण केली. जुना राजवाडा पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहदेव पाटील हा चारचाकी वाहनातून रंकाळा स्टँड परिसरातून पापाची तिकटीच्या दिशेने जात होता. तो पूर्णतः मद्यधुंद अवस्थेत असल्याने गंगावेश येथील भर चौकात त्याचा गाडीवरील ताबा सुटला. वाहन अनियंत्रित होत समोरून येणाऱ्या दोन रिक्षांना त्याने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक राजू ठोंबरे आणि प्रवासी अनिल भोसले हे जखमी झाले. तर दुसरे रिक्षाचालक महमद खान मुनाफ बागवान यांच्या रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आणि संतापलेल्या जमावाने मद्यधुंद चालक सहदेव पाटील याला मारहाण केली. याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले आणि सहदेव पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्यावर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि बेफिकीर वाहनचालकामुळे अपघात घडवणे या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर परिसरातील वातावरण निवळले.