राजारामपुरी चैन स्नॅचिंग प्रकरण उघडकीस; दोन आरोपी ताब्यात; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर – राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शहरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. मयूर जाधव आणि योगेश पिसाळ अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून तीन गुन्ह्यांचा छडा लावत तब्बल पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 ऑक्टोबर रोजी रुईकर कॉलनी परिसरात प्रमोदिनी हवालदार यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसका मारून लंपास केले होते. त्यानंतर मिरची हॉटेल परिसरातही एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न झाला होता.
दरम्यान, 10 नोव्हेंबर रोजी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळी कॉलनी परिसरात वृद्ध स्वाती कुलकर्णी यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास करण्यात आले. या तिन्ही गुन्ह्यांमुळे नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर राजारामपुरी पोलिसांनी तपासाची सूत्रे हातात घेतली. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांपर्यंत पोलीस पोहोचले आणि सांगली जिल्ह्यातील बावची येथील रहिवासी असलेल्या योगेश पिसाळ आणि मयूर जाधव यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, दोन दुचाकी आणि मोबाईल संच असा एकूण रु. 2,75,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, हवालदार कृष्णात पाटील, संदीप सावंत, विशाल शिरगावकर, सचिन पाटील, सत्यजित सावंत, अमोल पाटील, सुशांत तळप आणि नितेश बागडी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.