एलसीबी कारवाई – गांधीनगर बाजारपेठेतील चोरटा अटक
कोल्हापूर : गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने फोडून चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. रेहान शेख असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल संच असा एकूण १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गांधीनगर बाजारपेठेतील रेडीमेड कापड दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाख रुपयांची रोकड चोरी केली होती. तसेच शेजारील इतर सात दुकानांची शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी दुकानमालक किशोर मोटवानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधीनगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी रेहान शेख याला अटक केली. चौकशीत त्याने आणखी चार साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.