फायनान्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांनी कर्जदारांचे चौदा लाख रुपये केले हडप
कर्जवसुलीची रक्कम स्वतःच्या खिशात घातली...
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील भारत फायनान्स कंपनी ही गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहे. या कंपनीच्या माध्यमातून छोट्या स्वरूपाची कर्ज वितरीत केली जातात. वितरीत केलेल्या कर्जाच्या वसूलीसाठी या शाखेमध्ये सात कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी शिराळा तालुक्यातील इंगरुळ येथील रणजीत कांबळे, हातकणंगले तालुक्यातील माले येथील आकाश शिंदे, तारदाळचा यश घोटणे आणि पेठवडगांवची तेजस्विनी पाटील या चार कर्मचाऱ्यांनी कर्जदारांनी त्यांच्याकडं हफ्ते भरण्यासाठी दिलेली रक्कम परस्पर गायब केली आहे.
गेल्या तीन वर्षात या चौघांनी मिळून १३३ ग्राहकांचे चौदा लाख रुपये परस्पर हडप केले आहेत. भारत फायनान्स कंपनीचे शाखा मॅनेजर विष्णूदास पांचाळ यांनी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावरुन चौघां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश घोटणे आणि आकाश शिंदे या दोघांना अटक करण्यात आली आहे. रणजीत कांबळे आणि तेजस्विनी पाटील या दोघांचा शोध सुरु आहे.
सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग आणि फॉरेन्सिक लंबच्या टीमने भारत फायनान्स कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी करत काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या अपहार प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का ? याचा पोलीस शोध घेत आहेत.