भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीसाठी ‘दक्षता सप्ताह’ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आयोजन

<p>भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीसाठी ‘दक्षता सप्ताह’ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आयोजन</p>

कोल्हापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर यांच्या वतीने २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत “दक्षता जनजागृती सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वर्षीचा सप्ताह “दक्षता आपली सामाजिक जबाबदारी” या संकल्पनेवर आधारित असून, भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. या कालावधीत विभागामार्फत भित्तीपत्रके, शाळा–कॉलेजमधील जनजागृती कार्यक्रम, बसस्टँड आणि रिक्षा स्टॉपवर माहिती मोहीम, तसेच ग्रामीण भागात महिला बचत गटांच्या भेटी व ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे.

“शासकीय कार्यालयात कामासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी भीती न बाळगता विभागाशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव आणि ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाईल आणि संबंधित घटकाला न्याय मिळवून दिला जाईल," अशी हमी यावेळी वैष्णवी पाटील यांनी दिली आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे.