इचलकरंजीत कोयत्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुण जखमी

इचलकरंजी - शहरातील शाहू कॉर्नर परिसरातील पानपट्टीवर रोहन भांगे हा आपल्या काही मित्रांसोबत मावा खाण्यासाठी थांबला होता. त्याचवेळी ३ ते ४ इसमांनी त्याच्याजवळ येऊन तु आमच्या दुश्मनांसोबत फिरतोस, तुला सोडत नाही असे म्हणत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात रोहनच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या हल्ल्यानंतर सर्व संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ परिसरात गोंधळ उडाला होता.
दरम्यान, नागरिकांनी जखमी रोहनला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे. हल्ल्यानंतर गावभाग पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांच्या शोधासाठी स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.