डिलिव्हरी बॉयनं कंपनीला घातला दोन लाखांचा गंडा; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील एका कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या तरुणाने बनावट ऑर्डर करून कंपनीची तब्बल 2 लाख 6 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अभय करणुरकर आणि अमीर मकानदार या दोघांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रकाश शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभय करणुरकर हा इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस या कुरिअर कंपनीतर्फे फ्लिपकार्टच्या डिलिव्हरीसाठी काम करत होता. त्याने आपल्या मित्र अमीर मकानदार (रा. केसापूर पेठ) यांच्या नावावर सिमकार्ड खरेदी करून बनावट पत्त्यावरून आयफोन व अन्य महागडे इलेक्ट्रॉनिक साहित्य ऑनलाइन मागवले. डिलिव्हरीसाठी आलेल्या पार्सलमधून अभयने आयफोन काढून घेतले आणि रिकामे बॉक्स कंपनीमध्ये परत जमा केले. फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अशा प्रकारे अनेक बनावट ऑर्डर केल्या गेल्या असून, एकूण 2 लाख 6 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.